Wednesday, February 3, 2010

संगणकाची जादुई दुनिया -- my new book is published





Released on 2nd feb at the hands of CM
भूमिका

संगणकासंबंधी पुस्तक लिहाव अस मला का वाटल ? तस पाहिल तर या विषयावर पुष्कळ पुस्तक लिहिली गेली आहेत - इंग्रजी सोबत मराठीतूनही लिहिली गेली आणि आता तर शाळा कॉलेजेस मधून संगण्रक शिक्षण सुरु झाल्याने अभ्यासक्रमातील पुस्तकेही उपलब्ध आहेत. लहानमोठया व्यापारी व स्वयंसेवी संस्थांमध्ये आणि मध्यमवर्गीयांच्या घरांतही वैयक्तिक वापरासाठी मोठया संख्येने संगणक रुजू झाले आहेत. त्यांच्याकडील तरुण पिढीला संगणक चांगल्यापैकी वापरता येतो.

हे पुस्तक लिहितांना माझ्यासमोर कोण व्यक्ती आहेत? कोणासाठी हे पुस्तक आहे? सर्व प्रथम माझ्यासमोर आहे तो शासकीय कार्यालयांतील स्टाफ. सुमारे 20 लक्ष कर्मचा-यांना संगणकातील कांय कांय व किती किती येत याची सरासरी काढली तर त्यांना जेवढे यायला हवे त्यापैकी फक्त वीस टक्के येते असे माझे ढोबळ निरीक्षण आहे. तेही गेल्या दहा वर्षांत रुजू झालेल्या व तुलनेने तरुण असलेल्या स्टाफमुळे.
खरं तर शासनांत संगणक वापरण्यासाठी वैज्ञानिकांना असते तितकी प्रवीणता नकोच आहे. संगणक प्रोग्रॅमिंगमध्ये तज्ज्ञता असणेही गरजेचे नाही. तरीही शासनात संगणकाचा प्रभावी वापर न होण्याची दोन कारणे मला दिसतात. शासनांत संगणक संस्कृति यावी या धोरणाने 1981 मधेच केंद्र सरकारने प्रत्येक जिल्हयांत NIC चा संगणक कोऑर्डिनेटर नेमला होता. पण स्टाफ ट्रेनिंगचे धोरण ठरवले गेले नाही. त्या काळी संगणक तंत्र आरंभिक अवस्थेत असल्याने ट्रेनिंग सोपे नव्हते हे कारण कबूल करता येईल. 1985-90 च्या दरम्यान संगणकातील हार्डवेअर्सचे स्टॅण्डर्डायझेशन होउन बाजारात कमर्शियल स्केलवर संगणक आले, तसेच सॉफ्टवेअर्सचे तंत्रही विकसित झाल्याने प्रोग्रॅमिंग तज्ज्ञतेची गरज धाडकन दहा टक्क्याइतकी कमी झाली, मात्र ट्रेनिंगचा विचार झाला नाही. तेथून 1995 पर्यन्त संगणक वापरासाठी थोड्या प्रमाणांत प्रोग्रॅमिंग तज्ज्ञतेची गरज लागत होती. त्या काळांत ज्या उत्साही अधिका-यांनी संगणक संस्कृती रुजवण्याचा विचार केला त्यापैकी कित्येकांनी तज्ज्ञांच्या व ट्रेनिंगच्या अपुरेपणामुळे ते प्रयत्न सोडून दिले. ज्यांनी आग्रहाने प्रयत्न सुरु ठेवले त्यांनी आउट-सोर्सिंगवर सर्व भिस्त ठेवली. या दरम्यान जो स्टाफ संगणक शिक्षणाबाबत उत्साही होता त्यांचा उत्साह जाऊन हे आपल्यासाठी नाही -बरे झाले- शिकण्याची कटकट संपली अशी नकारात्मक भावना त्या शासकीय कर्मचा-यांमध्ये पसरली. 1995 नंतर संगणक वापरांत जो सोपेपणा आला त्याची दखल घेऊन पुन्हा स्टाफ ट्रेनिंगकडे वळावे हे प्रयत्न कोणी अधिकारी करेनात कारण तोपर्यंत आउटसोर्सिंगची संस्कृति वेगाने पसरली व ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट आणि स्टाफ ट्रेनिंग हे शब्द शासकीय कोषामधून हरवले. आता पुन्हा एकदा कर्मचारी वर्गाला या शिक्षणाची गरज वाटू लागली आहे. त्याच्यासाठी हे पुस्तक निश्चितपणे उपयोगी ठरेल.

दुसरीकडे माझ्या डोळ्यासमोर अशी सर्व साहित्यिक मंडळी आहेत ज्यांच्यामुळे मराठी भाषा समृद्ध होत असते आणि तरीही या समृद्धीचा वेग शतपटीने वाढण्यासाठी संगणक किती उपयोगी पडू शकतो याचा विचार त्यांनी केलेला नाही. मधुमंगेश कर्णिकांसारखे प्रथितयश लेखक एकदा मला म्हणाले -- मराठी लेखक अजूनही फार मोठया प्रमाणावर संगणक वापरत नाहीत. कारण सुरुवात कुठून कशी केली तर संगणकाचा इतर फापट-पसारा न शिकावा लागता आपल्या कामापुरतं निवडून आपण शिकू शकतो- हे माहीत नसत. या पुस्तकामुळे अशा मंडळींना संगणकामधील जे जे आवश्यक तेवढंच नेमकेपणाने ओळखून शिकून घेता येईल.

त्याचसोबत माझ्या डोळ्यासमोर माझी आई होती- तिला वेळ जाण्यासाठी वाचन व टीव्हीशिवाय कांही तरी स्वत:चे असे हवे होते- तिला मराठी टायपिंग व ईमेल शिकवले- म्हटले, आता लिही आपल्या आठवणी आणि पाठव ईमेल आपल्या नातवंडांना- दोघेही खूष! वयाच्या 81 व्या वर्षी तिला सायबर-सॅव्ही झालेली पाहून तिच्या भावंडांनाही गप्पांसाठी एक नवा विषय मिळाला.

माझ्यासमोर तिसरा गट अशा लाखो मुलीमुलांचा आहे ज्यांना शाळा शिकायला मिळाली नाही किंवा जुजबी शिक्षण मिळालं. पण संगणक दिसला की त्यांचेही डोळे लकाकतात आणि हे आपल्यालाही शिकायला मिळाव अस स्वप्न बाळगायला सुरुवात होते. त्याला मोठा खो देणारा विचारही लगेच येतो की आपल्याला तर इंग्लिश येत नाही मग संगणक कसा येणार? पण हे पुस्तक त्यांनी वाचलं अगर कुणी या पुस्तकावरून त्यांना समजावलं की त्यांनाही मराठी टायपिंग पासून सुरुवात करून संगणक शिकता येईल तर या देशातील एका मोठ्या गटाला निराळाच आनंद आणि आत्मविश्वास मिळवता येईल. माझ्या घरी कामाला येणा-या अशाच एका जेमतेम सातवी शिकलेल्या कामगाराला मी माझ्या संगणकावर मराठी शिकवून फावल्या वेळांत त्याने माझी सुमारे तीस पाने टाईप करून दिली. काम सोडतांना त्याने विनंति केली -- बाईसाहेब, मला याचे प्रिंट-आउट द्या. मी ते घरी जपून ठेवीन -- मलाही संगणक वापरता आला हे मी सर्वांना दाखवू शकेन.

संगणक या विषयावर मी वेळोवेळी लेख लिहिले आहेत. संगणकाला फक्त बायनरी अंकांची पध्दत कळते, आपण व्यवहारांत मात्र दशांश अंकपध्दती वापरतो -- तर मग संगणकाच्या अफलातून गणिती पध्दती बरहुकूम आपली नेहमीची पध्दत कशी बसवली जाते किंवा आपल्या पध्दतीची गणितं संगणक बायनरी म्हणजे द्बिअंश पध्दतीने कशी सोडवतो हा लेख 1980 मध्ये तरुण भारत पुणे साठी लिहिला. त्यानंतर संगणक पदनाम कोष - हा लेख मटामधे 1986 साली लिहिला. त्यामधे संगणकाचे हार्ड व स़ॉफ्टवेअर, नवे तंत्र यांची माहिती व बरेच मराठी पर्यायी शब्द सुचवले होते. भाषा संचालनालयाने मात्र अजूनही संगणक पदनाम कोषाचे सुरू केलेले नाही. त्यानंतर संगणकांत सोपेपणा आल्यामुळे त्याचा फायदा उठवत शासन व्यवहारांत संगणक कसा वापरावा यासंबंधी 1997 मध्ये साप्ताहिक विवेकच्या दिवाळी अंकातील लेख तसेच शासनांतीलल संगणक प्रणाली- हा लोकसत्तातील लेख वाचून खूप जणांनी असे कांही पुस्तक लिहिण्यांस सुचविले. संगणकावर इन्सक्रिप्ट की-बोर्डच्या पध्दतीने मराठी लिहिणे किती सोपे व ते जागतिक पातळीवर स्टॅण्डर्डाइझ झालेल्या युनिकोड प्रणालीमधे वापरले असल्याने किती फायद्याचे याबाबत- 2004 मधे छोटी फिल्म व 2008 मधे लोकसत्तेत लेख इत्यादि प्रयत्न चालू होते. याच दरम्यान रवींद्र देसाई यांचे विण्डोज मधील वर्ड व एक्सेल या दोन प्रोग्राम्सची अत्यंत सविस्तर व खुमासदार ओळख करुन देणारे "क कम्प्यूटरचा" व संगणकामागचे विज्ञान आणि भविष्याचा वेध घेणारे अच्युत गोडबोले यांचे "संगणक युग" ही दोन पुस्तके खूप गाजली. शिवाय शाळा कॉलेजच्या पाठ्यक्रमामधली पुस्तके होतीच.

तरी पण संगणकाच्या विविधांगी उपयोगांची माहिती देणारे पुस्तक उपलब्ध नव्हते असे दिसून आले. 1996 मध्ये नाशिक येथे विभागीय आयुक्त या पदावर रुजू झाल्यावर माझ्या लक्षात आले की तिथे सारणी किंवा तक्ते लेखनासाठी वर्ड हा प्रोग्राम वापरत. म्हणून मी स्वत:च माझे PA मंडळी व कांही इतर कर्मचारी यांचा एक वर्ग घेऊन टाकला व त्यांना सारणीसाठी वर्ड न वापरता एक्सेल का व कसे वापरावे हे शिकवले. हे व असे ट्रेनिंग सेटलमेंट आयुक्त असतांना त्या ऑफिसला व शेती महामंडळातील स्टाफला पण दिले. आता 2009 मध्ये मंत्रालयातील माझ्या सेक्शनमधील लोकांना मला हेच शिकवावे लागते ही विशेष काळजीची बाब आहे. पण ते उत्साहाने शिकल्यानेच मला हे पुस्तक लिहून पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली ही माझ्यापेक्षा त्यांची उपलब्धि म्हणावी लागेल.

तमाम शासकीय कर्मचारी, चाळीशीच्या पुढे गेलेले साहित्यिक, वानप्रस्थांत विरंगुळा शोधणारे ज्येष्ट नागरिक आणि शाळा चुकलेले तरीही नवे तंत्र शिकण्याचे स्वप्न बाळगणारे तरुण नागरिक अशा सर्वांना या पुस्तकात दिलेल्या संगणकाच्या छोटया छोटया युक्त्या निश्चित उपयोगी पडतील. निदान या युक्त्या आपण कधीही वापरू शकू असा आत्मविश्वास निर्माण झाला तरी पुस्तकाचे उद्दिष्ट सफल होईल.
भाग- 1 -- संगणक म्हणजे काय?
भाग- 2 --संगणक म्हणजे एक यंत्र
भाग- 3--संगणक म्हणजे युक्तीबाज जादूगर
भाग- 4--संगणक म्हणजे पाटी-पेन्सिल
भाग- 5--संगणक म्हणजे खेळगडी
भाग- 6 -- संगणक म्हणजे पोस्टमन
भाग- 7 -- संगणक म्हणजे टाइप रायटर
भाग– 8 -- संगणक म्हणजे हरकाम्या
भाग– 9 -- संगणक म्हणजे कपाट
भाग- 10 -- संगणक म्हणजे सुपर संदेशवाहक
भाग- 11 -- संगणक म्हणजे माहितीचा खजिना
भाग- 12 -- संगणक म्हणजे अफलातून गणित
भाग- 13 - संगणक म्हणजे थोडेसे बाजार व्यवस्थापन
भाग- 14 - संगणक म्हणजे मायेचा ओलावा
भाग- 15 -- संगणक म्हणजे खिडक्याच खिडक्या
भाग- 16 -- संगणक म्हणजे स्वत:चे पुस्तक
भाग- 17 -- संगणक म्हणजे आपले पुस्तकांचे कपाट
भाग- 18 -- संगणक म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ
भाग १९ -- संगणक म्हणजे आहे तरी कुणासाठी?
भाग- २० - संगणक म्हणजे सारणी लेखक
भाग- २१ - संगणक म्हणजे बुकिंग क्लार्क
भाग- २२ - संगणक म्हणजे पेपर सेटर
भाग- २३ - संगणक म्हणजे बैठक मॅनेजर
भाग- २४ - संगणक म्हणजे अकाउंट क्लार्क
भाग- २५ - संगणक म्हणजे चित्रकार
भाग- २६ - संगणक म्हणजे ग्रंथालय व्यवस्थापक
भाग २७ -- संगणक म्हणजे प्रकाशन विश्व
भाग २८ -- संगणक म्हणजे टेलीशॉपिंग
भाग २९ -- संगणक म्हणजे थोडेसे इलेक्ट्रॉनिक्स
भाग- ३० - संगणक म्हणजे हरिकथा
-------------------------------------------